औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत पक्षाला मराठवाड्यात घवघवीत यश मिळवून देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना अखेर प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागले. एक व्यक्ती एक पद या न्यायाने दानवे पायउतार झाले असले तरी या निर्णयाने जालना-औरंगाबाद या जिल्ह्यांची मोठी हानी होणार यात शंका नाही. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दानवेंना मंत्रीपदी बहाल केले होते. मात्र अवघ्या दोनच महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लावून मंत्रिपद काढून घेण्यात आले. मास लीडर अशी ओळख असलेल्या दानवे यांनी भाजपचे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. काँग्रेस-राष्ट्रवादी खिळखिळी करण्याबरोबरच महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यात दानवे यशस्वी झाले. जालना जिल्ह्यावरची पकड अधिक मजबूत करीत त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातही भाजपचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढविले. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला या जिल्ह्यात जम बसू दिला नाही तर काँग्रेसच्या नेत्यांना डोके वर काढू दिले नाही. या दोन्ही पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते भाजपच्या वळचणीला बांधले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला थेट अंगावर घेत दानवे यांनी भाजपला बळकटी दिली. राज्यात मित्रपक्ष शिवसेनेला अंगावर घेणारे दानवे एकमेव होते. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांची गच्छंती सेनेसाठी दिलासा देणारी ठरली, यात शंका नाही.
पंख छाटण्याचे प्रयत्न...
दरम्यान भाजपमध्ये रावसाहेब दानवे यांचे प्रस्थ वाढू लागले. गेल्या दोन वर्षांपासून दादा मुख्यमंत्री होणार अशी टूम दानवे यांच्या समर्थकांनी लावली होती. शिवसेनेशी सख्य नसलेल्या दानवे यांच्या विरोधात थेट मुंबईपर्यंत तक्रारी गेल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे प्रदेशाध्यक्ष म्हणून राहणे शिवसेनेला नको होते. परिणामी दानवेंना पद सोडावे लागले अशी चर्चा आहे.
खैरे गोटात आनंद...
लोकसभा निवडणुकी भाजप मुळेच पराभव झाल्याचा दावा आरोप शिवसेना करीत आहे. दानवे यांच्या जावयामुळेच खैरे हरले अशी भावना व्यक्त होत आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेना आमने-सामने आली होती. त्याची गंभीर दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली, असे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच थेट उद्धव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी भाजपवर दबाव टाकला असेही बोलले जाते.
जिल्ह्यातील समीकरणे बदलणार...
गेल्या चार वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा भाजपवर दानवे यांचाच वरचष्मा राहिला. जुन्या कार्यकर्त्यांना वळचणीला टाकून नव्यानेच पक्षात प्रवेश दिलेल्यांना मानाची पदे मिळाली. महापालिकेतही आपल्याच समर्थकांना आक्रमक बनवून दानवे यांनि ताकद दिली. सेनेला नामोहरण करण्याची एकही संधी दानवे यांनी सोडली नाही. दुसरीकडे स्वपक्षातील नेत्यांनाही दानवे यांनी अंगावर घेतले. त्यामुळे दानवे यांचे हितशत्रू वाढले होते. लोकसभा निवडणुकीच्या नंतर तर दानवे यांचा प्रभाव अधिकच वाढला. त्यामुळे औरंगाबाद सह जालना जिल्ह्यातील अनेक विधानसभा इच्छुक उमेदवार दानवे यांच्या घरी, कार्यालयात, मुंबईला रांगा लावून होते. उमेदवारीचा शब्द मिळालेले अनेक जण आता अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत पक्षात राहून वळचणीला लागलेले अनेक जण आता संधी शोधण्याच्या मार्गावर आहेत.
सेनेशी जुळवून घेणार का ?
दरम्यान, जालना -औरंगाबाद या दोन जिल्ह्यात सेनेसोबत भाजपचे संबंध अतिशय ताणलेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तर सेना हाच क्रमांक एकचा शत्रू असे भाजप नेते उघड बोलतात. या दोन्ही पक्षातील वादाचा फटका विधानसभा निवडणुकीत बसणार आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष पद बदलण्यात आल्याची चर्चा आहे. नवे प्रदेशाध्यक्ष यावर कसा मार्ग काढतात हे पाहणे रंजक ठरेल.